MHT CET सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया उशिराने का?
MHT CET 2024 admission : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर झाल्यानंतरही, राज्य सामायीक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, अॅग्रीकल्चर, लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशिर झाला आहे. त्याचवेळी खासगी आणि अभिमत विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया राबवून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक वर्षालाही सुरुवात केली आहे. सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू होत असल्याने, विद्यार्थ्यांना जादा शुल्क भरून खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यावा लागला आहे.
पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या निकालावर अवलंबून असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य मंडळाने यंदा बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर केला. याच कालावधीत सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, या परीक्षांचा निकाल उशिराने जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतरही, प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरू करण्याला पुरेसा कालावधी उपलब्ध होता. मात्र, सीईटी सेलकडून ही प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू केली. त्यामुळे ऑगस्टच्या दुसरा आठवडा संपत आल्यावरही, प्रवेशाची पहिली फेरी सुरू आहे.
त्याचवेळी राज्यातील खासगी आणि अभिमत विद्यापीठांनी नेहमीप्रमाणे वेळेत प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. आपल्या पाल्यांना प्रवेश मिळेल की नाही, अशी काळजी प्रत्येक पालकाला असते. अशा परिस्थितीत सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियांची माहिती वेळेत दिली जात नाही. प्रवेश फेऱ्यांच्या तारखा, वेळापत्रक, कॉलेजांची प्रवेशक्षमता आदींची माहिती वेळेत प्रसिद्ध होत नाही. त्यामुळे सीईटी सेलकडून राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश न झाल्यास, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना नाईलाजाने खासगी किंवा अभिमत विद्यापीठांत भरमसाठ शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागतो. सीईटी सेलने ही प्रवेश प्रक्रिया वेळेत राबविल्यास, अनेक विद्यार्थ्यांचा सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित कॉलेजांमध्ये वेळेत प्रवेश होऊन, त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सीईटी सेलकडून जाणीवपूर्वक उशीर?
सीईटी सेलकडे सीईटी परीक्षा घेऊन, त्यांचा निकाल वेळेत जाहीर करणे; तसेच निकालाच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया राबविणे, अशी मुख्य जबाबदारी असते. त्यातही हे काम करण्यासाठी सीईटी सेल निविदा प्रक्रिया राबवून, त्याचे कंत्राट खासगी आयटी कंपनीला देते. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेत सीईटी सेलला तंत्रशिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संचालनलाय अशा विभागांकडून मदत होत असते. सीईटी सेलकडेही स्वत:ची यंत्रणा आहे. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू करून, ती संथपणे का राबविण्यात येते, असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
Post expires at 1:14pm on Friday September 13th, 2024