SSC, HSC Result 2025 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! यंदा राज्यात झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर होणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मिळाली आहे. यावर्षीच्या परीक्षा लवकर घेतल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीही वेळेत पूर्ण झाली असून, निकाल प्रक्रियाही वेगाने सुरू आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन काही आठवड्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, लातूर, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. दुसरीकडे, दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात आहे आणि ती लवकरच पूर्ण होणार आहे.
शालेय परीक्षांचे वेळापत्रक यंदा लवकर ठेवण्यात आल्यामुळे निकालही मे महिन्याच्या मध्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल १५ मेच्या आसपास तर दहावीचा निकाल १७ किंवा १८ मे रोजी लागण्याची दाट शक्यता आहे. शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
निकाल वेळेत जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी हे वेळापत्रक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी निकालासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
यंदा पहिल्यांदाच निकाल एवढ्या लवकर लागणार असल्याने पुढील शिक्षणासाठीची तयारी सुरळीत होईल, असा विश्वासही मंडळाने व्यक्त केला आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE