सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.
सोमवारी (ता. २१ एप्रिल) दिलेल्या आदेशानुसार, दिव्यांग व दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवून बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे आता मुंबईतील जे. जे. रुग्णालयामार्फत फेरतपासणीसाठी पाठवली जाणार आहेत.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यंदा जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, संवर्ग एकमधून (शिक्षक संवर्ग) बदलीसाठी अनेक शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. मात्र, बार्शी तालुक्यात विशेषतः बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली मिळविण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील ५७१ पैकी तब्बल ८५ शिक्षकांकडे अशा प्रकारची संशयास्पद प्रमाणपत्रे असल्याचे उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये शिक्षकांनी आपल्या पाल्यांना मतिमंद असल्याचे दाखवून सवलतीचा लाभ घेतल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर, बार्शी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती. गैरप्रकार रोखण्यासाठी संघटनेने आंदोलनाचा इशाराही दिला होता. मंगळवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार होते. याशिवाय, समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन सविस्तर माहिती सादर केली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कृती करत, सर्व संशयित वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे, बदलीसाठी सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी जे. जे. रुग्णालयाकडून नव्याने वैद्यकीय तपासणी करून घेऊन प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, बोगस सवलतींच्या आधारावर होणाऱ्या बदल्यांना निश्चितच आळा बसणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE