बीएस्सी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?
B.Sc. Nursing Admission 2024 :
राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राबविण्यात येणाऱ्या बीएस्सी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेला अजून सुरूवात झाली नसल्याने, राज्यातील शेकडो विद्यार्थी चिंतातुर झाले आहेत. सीईटी सेलने उच्च शिक्षण; तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया जाहीर केल्या. मात्र, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या (DMER) अखत्यारीत येणाऱ्या बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही स्वतंत्र सीईटी घेऊनही सुरू केलेली नाही. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
सीईटी सेलकडून बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी गेल्यावर्षीपासून स्वतंत्र सीईटी घेण्यात येते. या सीईटीला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा राज्यभरातून ५८ हजार ६३५ अर्ज आले होते. यामध्ये सर्वाधिक पाच हजार ९३१ अर्ज नागपूरमधून आले होते. बीएस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. यामध्ये ३७ हजार ५२४ मुली, तर १२ हजार ६९१ मुलांचा समावेश होता. त्यातच राज्यातील कॉलेजमध्ये साधारण दहा हजाराच्या आसपास जागा उपलब्ध आहेत. त्यात सरकारी कॉलेजांची संख्या पाच असून त्यामध्ये अडीचशे जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे यांना एकूण परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्रवेशासाठी चुरस राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची उत्सुकता आहे. बीएसस्सी नर्सिंग सीईटीचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. हा निकाल जाहीर होऊन आता, एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही बीएसस्सी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे शेकडो विद्यार्थी अस्वस्थ असून, प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल, याच्या प्रतिक्षेत आहेत.
‘प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करा’
बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याबाबत सीईटी सेलकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले असून, प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. दरम्यान, ही प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.