महाराष्ट्रात तंत्रशिक्षण (DTE Admission) अभ्यासक्रम प्रवेशाला मुदतवाढ !
DTE Maharashtra Admission 2024 : हा निर्णय जाहीर करताना परिषदेने राज्य सीईटी कक्षाकडे सुधारित वेळापत्रक देत सूचना दिल्या आहेत. या वेळापत्रकानुसार आता तंत्रशिक्षणाच्या व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या संस्थात्मक प्रवेशांसाठी २३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे. तसेच महाविद्यालये व संस्था यांनाही आपल्या रिक्त जागा भरण्यासाठी मुदत मिळाली आहे.
तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या आणि थेट द्वितीय वर्ष लॅटरल एण्ट्रीच्या प्रवेशाची अंतिम मुदत आता एका महिन्याने वाढली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या सुधारित शैक्षणिक वेळापत्रकानुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे बीई, पदव्युत्तर अभियांत्रिकी आणि अन्य तंत्रशिक्षणांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी संस्थात्मक स्तरावर प्रवेश घेण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंतचा अवधी विद्यार्थ्यांकडे आहे. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
तंत्रशिक्षणाच्या व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश प्रक्रियेनंतरही अनेक जागा रिक्त राहिल्या. ही प्रवेशप्रक्रिया २३ सप्टेंबरपर्यंतच राबवण्यात आली होती. या जागा, तसेच संस्थात्मक कोट्यातील जागांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि तंत्रशिक्षणाच्या संस्थांकडून होत होती. या मागणीची दखल घेत अखेर तंत्रशिक्षण परिषदेने संस्थात्मक स्तरावर होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. मराठवाड्यातील शासकीय पॉलिटेक्निक संस्थांमधील ३८५० पैकी ३,८३५ जागांवर प्रवेश झाले. मराठवाड्यात पॉलिटेक्निकच्या १७ हजार ४२५ जागांपैकी एकूण १३ हजार ३४६ जागांवर प्रवेश झाले आहेत. ४ हजार ७९ जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांचे हे प्रमाण सुमारे २४ टक्के इतके आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जूनमध्ये पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. मराठवाड्यात पॉलिटेक्निकच्या ६४ संस्था आहेत.
यंदा नियमित प्रवेशाच्या तीन फेऱ्या पार पडल्या. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबविण्यात आली. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ३ सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली आहे. यंदा मराठवाड्यात एकूण जागांपैकी सुमारे ७७ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. तर २३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदा पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक पसंती ही संगणक शाखेशी संबंधित अभ्यासक्रमांना राहिली आहे. विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची प्रवेश क्षमता सर्वाधिक आहे. यामध्ये ४४५५ प्रवेश क्षमतेपैकी ३६५१ जागांवर प्रवेश पूर्ण झाले असल्याची माहिती विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक अक्षय जोशी यांनी सांगितले.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

