Female workers blocked traffic on the Bhndara-Nagpur National Highway! : कामगारांना सुरक्षा किट न मिळाल्याने महिला कामगारांनी भंडारा-नागपूर महामार्ग रोखला कामगारांना शासनातर्फे सुरक्षा व आवश्यक साहित्याने भरलेली किट वितरित केली जात आहे. प्रतीक्षेत राहूनही किट न मिळाल्याने आज सकाळी संतप्त महिला कामगारांनी भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखली.
नोंदणीकृत कामगारांना शासनाने सुरक्षा साहित्यासह किट वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आठ दिवसांपासून किट मिळवण्यासाठी कामगार प्रतीक्षेत होते, आणि आज सकाळी त्यांच्या संयमाचा बांध फुटला. महिला कामगारांनी बेला येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक रोखली. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कामगार शांत झाले.
महाराष्ट्र आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना सुरक्षा किट वितरित केली जात आहेत. किट वितरणाचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. बेला येथील एका लॉनमध्ये हे वितरण होणार होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून कामगारांना पेटी मिळण्यासाठी तारीख दिली जात आहे, आणि त्यासाठी राज्यभरातून कामगार येथे येतात. परंतु प्रत्येक वेळी “आज नाही, उद्या मिळेल” असे सांगून त्यांना परत पाठवले जात आहे. यामुळे कामगारांचा वेळ आणि पैसे वाया जात आहेत, आणि त्यांना रोजी देखील गमावावी लागते. या कारणामुळे कामगारांना प्रचंड मानसिक कष्ट सहन करावे लागले आहेत.
१७ तारखेला पेटी वितरण होईल असे सांगितल्यावर कामगार रात्रीच त्या ठिकाणी पोहोचले. लाखांदूर आणि पालांदुर सारखी गावं दूर असल्याने रात्रीच अनेक कामगार मुक्कामी आले. परंतु, सकाळी १० वाजता त्यांना सांगण्यात आले की आज पेटी वितरण होणार नाही. यामुळे कामगारांचा संयम सुटला आणि त्यांनी आक्रमक वर्तन सुरू केले. शेकडो संतप्त महिला राष्ट्रीय महामार्गावर बसल्या आणि घोषणाबाजी करू लागल्या. आठ दिवसांपासून किट मिळवण्यासाठी कामगार उभे राहत आहेत आणि दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर देखील पेटी मिळत नसल्याने त्यांचा संताप वाढला.
महिला आणि पुरुष कामगार पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत किटसाठी ताटकळत उभे राहतात, तर काहींनी रस्त्याच्या कडेला बसून रात्र जागून काढली आहे. अनेक महिला त्यांच्या लहान मुलांना घेऊन दोन दिवस मुक्कामी होत्या. यामुळे कामगारांची सुरक्षितता धोक्यात येत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण होऊ लागली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE