गोव्या मध्ये विविध सरकारी खात्यात सुमारे २,६१८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती कशी आणि कधी होईल या बद्दल सविस्तर जाणून घ्या. राज्यातील ३५ सरकारी खात्यांमध्ये अजूनही २,६१८ पदे रिक्त असून, यामध्ये सर्वाधिक पदे वीज विभागात ५९७, वन विभागात ३०९ आणि सार्वजनिक बांधकाम विभागात २६५ पदे रिक्त असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. ही माहिती आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली.
बोरकर यांनी विचारले होते की, सध्या किती सरकारी पदे रिक्त आहेत, मागील साडेतीन वर्षांत कर्मचारी भरती आयोगामार्फत किती भरती झाली आहे आणि आयोगाने किती पदे भरली आहेत. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ३५ खात्यांमध्ये एकूण २,६१८ पदे रिक्त आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत कर्मचारी भरती आयोगाने सात खात्यांमधील रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या, ज्यामधून ४९ पदांवर भरती झाली आहे.
तसेच आणखी ४४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यातील ३४ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. याशिवाय, गट ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील १७१ राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदांसाठी गोवा लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.
हे पदे थेट भरतीने किंवा पदोन्नतीद्वारे भरली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सध्या १०२ राजपत्रित अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार दिला असून, भरती पूर्ण झाल्यावर त्यांना या अतिरिक्त जबाबदाऱ्या सोडवण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी भरती आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा आणि निवड प्रक्रिया योग्यरीत्या पार पडत आहेत का, या संदर्भातही बोरकर यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आयोगामार्फत होणाऱ्या सर्व परीक्षा व निवड प्रक्रिया या गोवा कर्मचारी भरती आयोग कायद्यानुसारच पार पडत आहेत आणि नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE