बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे राज्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती आणि फसव्या शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार कक्ष अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना चौकशीसंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे. या चौकशीसाठी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत.
या प्रकरणात अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावावर बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले, आणि त्या आधारे अनेक वर्षांपासून अनधिकृत पगार उचलला जात होता, असे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सायबर पोलिसांनी या संदर्भात एनआयसी आणि महाआयटी सर्व्हरमधून माहिती मागवली असून, शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाबाहेरील संगणकांवरून करण्यात आली असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्याची आर्थिक व्याप्ती शेकडो कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात काही शाळा चालक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने शिक्षण व्यवस्था भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. शासन, शिक्षक आणि पालकांची फसवणूक करण्यात आली आहे. हा घोटाळा केवळ नागपूर विभागापुरता मर्यादित नसून, त्याचा व्याप संपूर्ण राज्यभर आहे, ही बाबही उघड झाली आहे.
या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाला सखोल चौकशीचे आदेश दिले. यानंतर कक्ष अधिकारी निशा महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE