Ladki Bahin Yojana: The amount of ₹1500 cannot be increased to ₹2100 : राज्य सरकारमधील महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघड होत असून, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या खात्याच्या निधीवाटपावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या खात्याचा हक्काचा निधी रोखला जात आहे आणि त्यामुळे अनेक योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
“अजित पवार जाणीवपूर्वक असं करत आहेत, असं मी म्हणत नाही. मात्र त्यांना गाईड करणारे, विशेषतः अकाऊंट विभागातील अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली असावी. माझ्या खात्याचा हक्काचा निधी मला मिळालाच पाहिजे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. सध्या त्यांच्या खात्याचे सुमारे ३ हजार कोटी रुपये थकलेले असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना महिन्याभरापूर्वी पत्र देऊन सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
लाडकी बहिण योजनेच्या निधीमुळे इतर खात्यांवरील ताण वाढला असून, या योजनेस विरोध नसतानाही इतर योजनांच्या निधीतून कपात होणे योग्य नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. त्यांनी नमूद केले की, सामाजिक न्याय खात्यामार्फत दलित, अल्पसंख्यांक,मागासवर्गीय यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात आणि या योजनांचा निधी कमी झाल्यास प्रत्यक्ष लाभार्थ्यांवर परिणाम होईल. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, आदिवासी विकास विभाग स्वतंत्र असून, त्यांच्या खात्याच्या निधीतून कपात करणे चुकीचं आहे.
राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत, शिरसाट म्हणाले की, सरकारवर ताण आहे हे मान्य असलं तरी “लाडकी बहिण” योजनेसाठी इतर खात्यांवर अन्याय करून निधी उचलणे योग्य नाही. “जर गरज पडली, तर भले कर्ज घ्या, पण खात्यांचा न्याय झाला पाहिजे,” असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, अजित पवार यांच्याशी त्यांचा वैयक्तिक राग नाही, परंतु आपले खाते व त्यातील योजना ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी योग्य निधी मिळायलाच हवा.
शिरसाट यांच्या या पत्रकार परिषदेतून महायुती सरकारच्या अंतर्गत मतभेद, विशेषतः निधीवाटपावरून वाढलेली ताणतणावाची स्थिती स्पष्ट झाली आहे. त्यांच्या मते, योजना बंद होऊ नयेत, लाभार्थ्यांवर परिणाम होऊ नये, म्हणूनच हा प्रश्न उचलून धरणे आवश्यक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE