NEET पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाइंड संजीव मुखिया अखेर अटकेत; अनेक धक्कादायक तथ्य उघड NEET 2024 पेपर लीक प्रकरणात तब्बल काही महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी संजीव मुखिया याला अखेर अटक करण्यात आली आहे.
५ मे २०२४ रोजी झालेल्या NEET परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणानंतर संजीव मुखिया फरार झाला होता. या प्रकरणात त्याच्यावर NEET सह इतर अनेक स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक केल्याचा आरोप आहे. बिहार पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.
संजीव मुखिया हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नागरनौसा गावाचा रहिवासी असून, याआधीही त्याचे नाव अनेक पेपर गळती प्रकरणांमध्ये समोर आले आहे. विशेषतः २०१६ मध्ये झालेल्या बिहार कॉन्स्टेबल भरती परीक्षा गळती प्रकरणात त्याची नाव स्पष्टपणे समोर आली होती. त्यानंतरच्या काळात विविध परीक्षा गळती प्रकरणांशी त्याचे संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
NEET पेपर लीक प्रकरणात मुखिया याचा सहभाग असल्याच्या संशयावरून बिहार सरकारने त्याच्या अटकेसाठी ३ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात झारखंडमधील देवघर येथून या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये चिंटू नावाचा एक आरोपी संजीव मुखियाचा नातेवाईक असल्याचे समोर आले होते.
संजीव मुखिया हा नालंदा येथील कृषी महाविद्यालयात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत होता. त्याच्या कुटुंबाचाही या प्रकरणाशी थेट संबंध आहे. मुखियाची पत्नी ममता मुखिया हिने विधानसभा निवडणूक लढवली असून, त्याचा मुलगा शिवकुमार देखील पेपर लीक प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणात पाटणा सिव्हिल कोर्टाने जानेवारी २०२४ मध्ये मुखियाविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते.
मुखियाच्या अटकेनंतर आता या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून आणखी काही आरोपी लवकरच जेरबंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE