MPSC Clerk-Typist 2023 Result Announced : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखन भरती 2023 च्या निकालासंदर्भात महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन 26 महिने उलटले आहेत आणि मुख्य परीक्षा होऊनही 14 महिने झाले आहेत. इतका मोठा कालावधी उलटूनही आयोगाने अद्याप तात्पुरती निवड यादी किंवा अंतिम यादी प्रकाशित केलेली नाही.
त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यांना आर्थिक व मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. आयोगाकडे यासंबंधी वारंवार विचारणा होत होती. यावर स्पष्टीकरण देताना आयोगाने म्हटले आहे की, लिपिक-टंकलेखन संवर्गाच्या निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 अंतर्गत या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी 11 फेब्रुवारी 2025 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारी व 1 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकाऱ्यांनुसार पसंतीक्रम मागवण्यात आले होते.
यासंदर्भात अजूनही अनेक उमेदवारांकडून विचारणा सुरू आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, पदांची संख्या, आरक्षण, शैक्षणिक अर्हता यासारख्या बाबींची पडताळणी करून पुढील आठवड्यात तात्पुरती निवड यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना ‘Opt out’ म्हणजेच नोकरीपासून माघार घेण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE