MPSC Recruitment for 2695 Posts 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या गट-अ भरतीची घोषणा केली आहे. याअंतर्गत एकूण २,७९५ पदांची भरती केली जाणार असून, अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे.
ही भरती पशुधन विकास अधिकारी या पदासाठी केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mpsc.gov.in/home जाऊन सविस्तर माहिती घेऊन, वेळेत अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मे २०२५ आहे.
ही भरती महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या रिक्त जागा भरून विभागाच्या कामकाजात वेग आणण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ अंतर्गत ४,६८४ मंजूर पदांपैकी फक्त १,८८६ पदे सध्या कार्यरत आहेत, तर उर्वरित २,७९८ पदे रिक्त आहेत. याशिवाय, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ८ अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे एकूण २,८०६ पदे रिक्त होण्याची शक्यता आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹३९४ तर आरक्षित प्रवर्गासाठी ₹२९४ असे ठेवण्यात आले आहे.
राज्यातील ग्रामीण भागात पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित काम अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पशुधन विकास अधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ही भरती फक्त रोजगार संधी नाही, तर राज्याच्या ग्रामीण विकासातही मोलाची भूमिका बजावणारी ठरणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE