राज्यातील अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला “आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3” अशी नावे देण्यात आली आहेत. हा अभ्यासक्रम महिला व बालकल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात आला आहे. त्याचा विकास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT), पुणे यांनी केला आहे.
या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य आणि पूरक साहित्य SCERT मार्फत उपलब्ध करून दिले जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार, राज्यातील शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यानुसार:
2025-26: इयत्ता 1 ली
2026-27: इयत्ता 2 री, 3 री, 4 थी, 6 वी
2027-28: इयत्ता 5 वी, 7 वी, 9 वी, 11 वी
2028-29: इयत्ता 8 वी, 10 वी, 12 वी
बालवाटिका 1, 2 आणि 3 या अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय जारी केला जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये वापरासाठी विकसित शैक्षणिक साहित्य – जसे की कृतीपुस्तिका, समग्र प्रगती पुस्तिका व पूरक अध्ययन साहित्य – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात वापरासाठी दिले जाणार आहे.
हे साहित्य एका वर्षाच्या कालावधीत वापरून त्याचा उपयोगिता आणि परिणामकारकतेचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या स्तरावरून या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुढील कार्यदिशा ठरवण्यात येईल, असे संबंधित परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati