लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, काही पात्र महिलांना आता दरमहा पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत सुमारे ५० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला, आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला, सरकारी कर्मचारी, कुटुंबात चारचाकी वाहन असणे किंवा एकापेक्षा अधिक योजना घेतलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, योजनेतील १४ लाख महिलांना आता दरमहा केवळ ५०० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. या महिला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत केंद्र सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये व राज्य सरकारकडून सहा हजार रुपये दिले जातात, म्हणजे दरमहा एक हजार रुपये.
त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला जाईल. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीतील १२ हप्ते जमा करण्यात आले आहेत.
जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला असून जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्टला असून त्याआधीच हप्ता मिळेल असे बोलले जात आहे.
काही अहवालांनुसार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत. याचदरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता महिलांना पंधराशे रुपये सुद्धा पूर्णपणे मिळत नाहीत, याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE