नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण ३०९ रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात आले होते.
या संदर्भातील जाहिरात महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी एकूण ३,०३९ अर्ज प्राप्त झाले असून त्यामुळे भरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या भरतीमध्ये ‘एएनएम’ पदासाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले असून, ५३ जागांसाठी तब्बल १,०४३ अर्ज आले आहेत. यानंतर स्टाफ नर्सच्या ६७ पदांसाठी ८१६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, बालरोगतज्ज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदांसाठी एकाही उमेदवाराने अर्ज न केल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय विभागाकडून प्राप्त अर्जांची तपासणी सुरू असून, पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सेवा सुधारण्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या पदांची ही भरती केली जात आहे. ही पदभरती मुख्यतः महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रे व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या जागांकरिता राबवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे
प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एमबीबीएस आणि तज्ज्ञ पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार असून, त्यानंतर निवड करण्यात येईल. इतर पदांसाठी उमेदवारांची निवड मेरिट सूची आणि बिंदुनामावलीच्या आधारे करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे अपडेट्स पाहावेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE