Summer Exams? : शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षांसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाला शिक्षक, पालक आणि विविध संघटनांचा विरोध होत आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो, अशी भावना शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) ने ८ ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागांत या काळात तीव्र उष्णतेची लाट असते. त्यामुळे एप्रिलमध्ये परीक्षा घेणे योग्य नाही, असा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ही परीक्षा १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.
राज्यातील अनेक शाळा उन्हाळ्याच्या सुटीनंतर म्हणजे जूनमध्ये सुरू होतात. मात्र, सीबीएसई शाळांच्या धर्तीवर राज्यातील शाळाही चालू ठेवण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांसाठी हा निर्णय अडचणीचा ठरू शकतो.
मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले की, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता शिक्षण व्यवस्थेत बदल करताना विचारपूर्वक पावले उचलायला हवीत. गावाकडील सण, यात्रा, तसेच उन्हाचा त्रास याचा विचार करून पारंपरिक पद्धतीनेच शैक्षणिक वेळापत्रक ठरवायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE