Teacher recruitment will begin from next week : राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेत पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये अभ्यासक्रम लागू केला जाईल. यासंबंधी असलेले गैरसमज दूर केले जातील. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शिक्षकांची भरती वेळेत केली जाईल आणि यासाठी काही संस्थांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने शिक्षक भरतीची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे.
दादा भुसे यांनी राज्यातील पहिल्या वर्गासाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातून टीकेची लाट आली होती. त्यावर उत्तर देताना भुसे यांनी सांगितले की, “या अभ्यासक्रमाविषयी असलेले गैरसमज दूर केले जातील आणि अधिवेशनात त्याबाबत सर्व माहिती दिली जाईल. त्यानंतर या अभ्यासक्रमाचे सर्व स्तरांवर स्वागत होईल.”
त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, “सीबीएसई आले म्हणजे बालभारती राज्य बोर्डाचे अस्तित्व संपणार नाही. त्यांच्या अभ्यासक्रमातील काही भाग आम्ही घेणार आहोत, पण आपला इतिहास आणि भूगोल कायम ठेवणार आहोत.” पालकांना माहिती देण्यासाठी येत्या दोन दिवसांत विधानसभेत त्याची संपूर्ण माहिती सादर केली जाईल. या वर्षी पहिल्या वर्गासाठी हा अभ्यासक्रम लागू होईल आणि तीन वर्षांच्या कालावधीत तो १२ वीपर्यंत वाढवला जाईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE