शालेय विद्यार्थ्यांना आता शाळेतूनच करिअर कार्ड मिळणार आहे. या धोरणातून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातूनच व्यावसायिक धडे देण्याचा त्यांचा मुद्दा आहे. या धोरणाची अंमलबजावणी एससीईआरटी अंतर्गत होणार आहे. सुमारे १३ क्षेत्रातील ५०० प्रकारच्या रोजगाराची माहिती या कार्डद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
शाळा सुटल्यावर लागलेली भूक भागवण्यासाठी किती जणांना खरोखर रोजगार मिळतो? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) आता विद्यार्थ्यांच्या हाती ‘करिअर कार्ड’ देणार आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे शालेय शिक्षण रोजगारक्षम बनवणं. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यावसायिक शिक्षणाला मोठं महत्त्व देण्यात आलं आहे.
शाळेच्या अभ्यासक्रमातूनच कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाची बीजं पेरण्यावर भर देण्यात आला आहे. याच धोरणाची अंमलबजावणी करताना SCERT ने ‘करिअर कार्ड’ तयार केलं आहे. या करिअर कार्डमध्ये १३ क्षेत्रांतील ५०० प्रकारच्या नोकऱ्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. हे कार्ड तयार असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी SCERT ने १५ ते १७ जुलैदरम्यान राज्यातील निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले.
हे प्रशिक्षित शिक्षक आता DIET (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) च्या मदतीने त्यांच्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत हे कार्ड पोहोचवतील. कार्ड देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची आवड व क्षमता ओळखली जाणार आहे. एखाद्या विषयात असलेली गती ओळखून त्या विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार करिअर कार्ड दिलं जाईल.
त्यामुळे त्याला आपली आवडती कारकीर्द निवडताना कोणत्या विषयावर भर द्यायचा, कोणता अभ्यासक्रम निवडायचा, आणि कोणत्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा यासारखे निर्णय घेणं अधिक सोपं होणार आहे. या करिअर कार्डची निर्मिती ‘युनिसेफ’ संस्थेने केली आहे. सध्या हे कार्ड इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
मात्र, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी त्याचे मराठी भाषांतर करण्यात येत आहे. यासाठी १५ ते १७ जुलै दरम्यान शिक्षकांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली. कार्डचे भाषांतर सध्या सुरू असून, लवकरच ते विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे. या कार्डमध्ये प्रत्येक नोकरीशी संबंधित शिक्षणक्रमाची माहिती, फी किती आहे, शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक कर्जाची उपलब्धता यासारखी उपयुक्त माहितीही समाविष्ट असणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE