महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी (११वी) प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in अखेर सुरू केले आहे. या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार असून विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया येत्या १९ मे २०२५ पासून सुरू होणार आहे.
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांनी व पालकांनी याच अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाईन अर्ज भरूनच प्रवेश घेता येणार आहे.
याआधी हे संकेतस्थळ ८ मेपासून सुरू होणार होते, मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते सुरू होऊ शकले नाही. अखेर ९ मेपासून हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून कनिष्ठ महाविद्यालयांसाठी नोंदणीसाठी खुले करण्यात आले आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सुरू करण्यात येते. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत दोन टप्पे असतात – पहिल्या टप्प्यात विद्यार्थी आपली वैयक्तिक माहिती भरतात आणि दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयांची पसंतीक्रम देतात. मात्र यंदा दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी वैयक्तिक माहिती भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार नसल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळांनी १५ मेपूर्वी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले असून त्यानंतर १९ मेपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या संकेतस्थळाच्या अधिकृत सुरूवातीपूर्वी काही व्यक्तींनी शासनाचा लोगो आणि शिक्षण मंत्र्यांच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट संकेतस्थळ तयार केल्याचे उघड झाले आहे.
या संकेतस्थळावर खासगी महाविद्यालयांची जाहिरातही करण्यात आली होती. या प्रकारावर शिक्षण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरावा आणि कुठल्याही फसवणुकीपासून सावध रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE