बारावी नंतर उत्तम करिअर ची निवड करायची आहे. तर ICAI ने अकाउंटंट बनण्याची संधी बारावी पास झालेल्यांसाठी दिली आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकेल.अकाउंटिंगचं प्रशिक्षण यात मिळेल. हा कोर्स ग्रामपंचायत आणि नागरपालिकांसाठी आहे. परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल.
बारावी उत्तीर्ण तरुणालादेखील लेखापाल अर्थात अकाउंटंट होण्याची संधी दी इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) प्राप्त करून दिली आहे. त्यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षित विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लेखापाल म्हणून नियुक्तीसाठी मदत होणार आहे. या अभ्यासक्रमाला तरुणांची पसंती मिळत असून २०२४-२५ या वर्षभरात ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
आयसीएआय आणि भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लेखापालांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आणि चालविण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. आयसीएआयच्या २०२४-२५ या वार्षिक अहवालानुसार, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लेखापाल होण्याची संधी देणारा एक छोटेखानी अभ्यासक्रम तरुणांच्या पसंतीचा ठरत आहे. ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पात्र लेखापालांची कमतरता भरून काढणे आणि गावपातळीवर आर्थिक पारदर्शकता व जबाबदारी सुधारण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये अकाउंटिंगशी संबंधित मूलभूत संकल्पना, मूलभूत लेखा प्रक्रिया जसे की जर्नल नोंदी, खातेवही, ताळेबंद, बँकिंग व्यवहारांचे विवरण, पावतीबूक, पेमेंट खाते, आर्थिक विवरण तयार करणे आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येते. महापालिका आणि ग्राम पंचायत या दोन्हींच्या अभ्यासक्रमात थोडेफार अंतर असून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येते. वर्षातून दोनवेळा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. सध्या या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक साहित्य दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, ओडिया, गुजराती, कन्नडा, बंगाली, पंजाबी यांचा समावेश आहे. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यामुळे बारावीनंतर अकाउंटिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE