भूमी अभिलेख विभागाची अर्हता परीक्षा पास झालेल्या या विभागातील ७६ कर्मचाऱ्यांना बढती मिळाली आहे. परीरक्षक भूमापक आणि निमतानदार यांना शिरस्तेदार व मुख्यालय सहायक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊनही कर्मचाऱ्यांना वर्ग-२ च्या पदावर पदोन्नती मिळाली नव्हती. प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आलेल्या संवर्गावर जाण्यासाठी त्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी ५ ऑगस्टला एकाचवेळी राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. पदसमूह तीनमध्ये तीन वर्षे सेवा व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निमतदार व परिरक्षक भूमापक यांना पदोन्नती मिळाली. ते आता पदसमूह दोनमध्ये समाविष्ट झाले आहे. या पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढे गट ‘ब’ राजपत्रित अधिकारी वर्गदोनमध्ये पदोन्नतीचा मार्गही मोकळा झाला आहे.
मुख्यालय सहायक व शिरस्तेदार ही पदे भरल्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. सध्या या विभागात गावठाण मोजणीची कामे सुरू आहेत. यासाठी मोठे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. शिवाय, ड्रोन सर्व्ह, ई-मोजणी, आदी प्रकल्प या विभागामार्फत राबविली जात आहे.
भूमी अभिलेख विभागात विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, कर्मचायांच्या तुटवड्यामुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. सर्वेअरची १२५० कर्मचायांची भरती प्रक्रिया थांबली आहे. तातडीने ही भरती केली पाहिजे, असे विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी सांगितले.
विभाग – पदोन्नत कर्मचारी
अमरावती -१५
नाशिक -१६
पुणे -१८
औरंगाबाद -९
मुंबई -१८