80 हजार नोकरभरती करणार – मुख्यमंत्री
राज्यात विविध विभागांतील रिक्त जागांचा आढावा घेतला आहे. बेरोजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार आहेत. यात पोलीस भरतीला प्राधान्य देण्यातयेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथील सभेत केले.
१० कोटींचा निधी जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनाला दहा कोटींचा निधीही जाहीर केला, तर औंढा नागनाथच्या विकासासाठी मंजूर झालेले ६० कोटी लवकरच मिळतील. विपश्यना केंद्र, अन्नप्रक्रिया उद्योग याला चालना देऊ. बाळापूरला तालुकानिर्मितीबाबत सकारात्मक असून, नासाची प्रयोगशाळा केंद्र शासनाकडे मुद्दा मांडून मार्गी लावू, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षण महायुतीच्या काळात दिले होते. नंतर हे प्रकरण आता न्यायालयात आहे. ते मिळण्यासाठी तज्ज्ञांची फौज उभी करू, मात्र, तोपर्यंत मराठा समाजाला विविध फायदे देण्यात येत असल्याचेही शिंदे म्हणाले.
यावेळी मंचावर माजी मंत्री संजय राठोड, आ. बालाजी कल्याणकर, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. विप्लव बाजोरिया, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, राजेंद्र शिखरे, राजेश्वर पतंगे, सुभाष बांगर, फकिरा मुंडे, राम कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील महिनाभरापासून लोक नावे ठेवत आहेत. मात्र, त्यांना कामातून चोख उत्तर देऊ. जनतेला महायुतीचे उमेदवार म्हणून मते मागितली. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराने मते मागितली. तो विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत बसणेच योग्य आहे. यात चूक कोणाची, हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जेथे जातोय, तेथे प्रसन्न मुद्रेने लोक स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले. आता डबल इंजिनचे सरकार आहे. केंद्र भरभरून मदत करायला तयार आहे.