पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत गोंधळ; सर्वर डाऊन !
SPPU PET exam 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने पीएच.डी. प्रवेश परीक्षा घेतली जात आहे. यापूर्वी या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आधी शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद संदर्भातील बातम्या विविध प्रसारमाध्यमे/ वृत्तवाहिन्यावर प्रसिध्द झालेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी/विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब/अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २४ ऑगस्ट ऐवजी आता ३१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे, असं सांगण्यात आले होते. पण आज घेत असलेल्या परीक्षेत सर्वर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्रात गोंधळ उडाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षांचे नियोजन करण्यात गडबड झाल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या विविध विभागामधील व संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रातील पीएचडी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या पेट परीक्षेसाठी विद्यापीठाने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र, विद्यापीठाने नियुक्त केलेल्या काही परीक्षा केंद्रावर पहिल्या टप्प्यातील परीक्षेच्या वेळेमध्ये बदल करुन अर्धा तास उशिराने ही परीक्षा सुरू होईल, असे जाहीर केले आहे. सर्वर डाऊन झाल्याचे कारण विद्यापीठाकडून दिले जात आहे. मात्र, यामुळे तीनही टप्प्यातील परीक्षामध्ये सहभागी होणारे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विद्यापीठाने २४ ऑगस्ट रोजीची परीक्षा ३१ ऑगस्ट रोजी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा वेळेवर सुरू होणे अपेक्षित होते परंतू तसे नियोजन करण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे.
‘पीएचडी’चे प्रवेश ‘नेट’च्या गुणांआधारे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) घेण्यात आला होता. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पीएचडी प्रवेश ‘नेट’च्या माध्यमातून होणार असले, तरी यंदा ‘पेट’च्या माध्यमातूनही हे प्रवेश करण्यासाठी विद्यापीठामार्फत ‘यूजीसी’कडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानुसार यंदा पुणे विद्यापीठामार्फत ‘पेट’च्या माध्यमातून पीएचडी प्रवेश केले जाणार आहेत.